
PUNE: देशातील बाजारात सोयाबीन दरातील नरमाई (Soybean Rate) कायम आहे. बाजारातील आवकही वाढली. सोयाबीनचे दर (Soybean Market) जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कमी होत गेले.
शेतकरी तेव्हापासून दरवाढीची वाट पाहत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात मोठे चढ उतार झाले. पण देशातील बाजारात नरमाई कायम होती.
पण मागील आठवड्यापासून दरातील नरमाई वाढली. पण सोयाबीन (Soybean Bajarbhav) दरातील ही नरमाई जास्त दिवस राहणार नाही, असं जाणकारांनी सांगितलं
चांगल्या दराच्या अपेक्षेनं यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन मागं ठेवलं होतं. नोव्हेंबर महिन्यात दरानं ६ हजारांचा टप्पा गाठलाही. पण त्यानंतर दरात घट होत गेली.
अनेकदा दरवाढीसाठी शक्यताही निर्माण झाली. पण सोयाबीनचा खरेदीदर वाढला नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात काहीशी वाढ झाली. पण काही दिवसांमध्येच दरपातळी पुन्हा नरमली.
जानेवारीत सोयाबीनची दरवाढ कायम राहील, अशी आशा होती. पण सरकारच्या धोरणामुळं बाजारातील परिस्थिती बदलली. सरकारनं खाद्यतेल आयातीला मोकळ रान केलं.
खाद्यतेल आयातीवरील शुल्क कमी केलं. सोयाबीनतेलाची शुल्कमुक्त आयात केली. त्यामुळं देशात खाद्यतेलाचा मोठा साठा निर्माण झाला. याचा दबाव सोयातेलावर आला.

आयातशुल्क वाढण्याचा अंदाज
केंद्र सरकार आता खाद्यतेल आयातीवरील शुल्क वाढवण्याचा अंदाज आहे. असे झाल्यास देशातील सोयातेलाचे दरही वाढू शकतात. कारण सोयापेंडला चांगली मागणी आहे. सोयातेलाचे दर वाढल्यास सोयाबीनलाही आधार मिळेल, असं प्रक्रियादारांनी सांगितलं.
दर वाढतील
सध्या बाजारात सोयाबीनची आवक वाढली. त्यामुळं सोयाबीनचे दर दबावात असले तरी हा दबाव कायम राहणार नाही. त्यामुळं शक्य असल्यास शेतकऱ्यांनी विक्रीसाठी थांबावं.
पुढील काळात सोयाबीनला सरासरी ५ हजार ५०० ते ६ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.